८ दिवस, ७ तास आणि ३८ मिनिटे

 


काका माझी टॅग लाईन आहे - Be Cool 😎 Pedal to School ', ओम महाजन हे शांतपणे सांगत होता. राजा दशपुत्रे याने या अवलियाशी भेट घडवून आणली होती आणि आज सकाळी आम्हीं गप्पा मारत होतो. कोण आहे हा ओम ? हा के टू के हे ३६०० किलोमीटर हे अंतर आठ दिवसात पार करणारा नाशिकचा अठरा वर्षांचा युवक आहे. के टू के म्हणजे - काश्मीर ( श्रीनगर ) ते कन्याकुमारी. दररोज बावीस तास सायकलिंग ! म्हणजे फक्त दोन तास झोप ! दररोज सरासरी ४५० किलोमीटर पायडलिंग ! ऊन असो, पाऊस असो, धुकं असो, ट्रॅफिक जॅम असो अथवा पंक्चर असो - एकच ध्यास - कन्याकुमारी - दक्षिणेकडे. एक बरं आहे - उत्तरेकडून दक्षिणेकडे फक्त उतार आहे त्यामुळे सायकल चालवणं सोप्पं असावं. अहो बोलता बोलता , सोर्री, सायकल चालवता चालवता या मुलाने 'गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड' केला - दिवस, तास आणि ३८ मिनिटे. हे सगळं करायला माणूस वेडा असायला हवा. खरंतर मला 'माणूस चक्रम असायला हवा' असं मला म्हणायचं आहे. कारण एक वेगळ्या अर्थाने मीही चक्रम आहे. मी प्रवास करतो तर हा मुलगा सायकल चालवत राहतो. या मुलाला वडिलांकडून आणि काकांकडून बाळकडू मिळालेलं आहे ( बाप आणि काका हेही - **). हा एक दुग्ध शर्करा योग आहे. ओमचे डॉक्टर वडील आणि डॉक्टर काका असेच धाडसी - एवरेस्ट, मॅरेथॉन, स्कीईंग वैगरे वैगरे. त्यामुळं 'मला काही करायचं होतं पण घरून विरोध झाला' असं काही ओमला सांगता येणार नाही उलट ओम म्हणाल्याबरोबर, वडिलांनी पूर्ण सपोर्ट दिला आणि ' ओम गिनीज रेकॉर्ड होल्डर ' झाला. केवळ 'आश्चर्यम'. गप्पा मारतांना आम्ही फक्त आश्चर्यचकित होत होतो. ओम कुठेही 'भास' मारत नव्हता. अगदी जमिनीवरच होता. अनुभव सांगताना नितळ आणि निर्मळपणा जाणवत होता. आज मी 'संवाद-उत्सुक' नव्हतो. आम्हीं आज ऐकायला गेलो होतो. मी प्रश्न विचारात होतो आणि तो उत्तरं देत होता. माणूस काहीही करू शकतो, फक्त त्याने ध्यास घ्यायला हवा. बरं या करिता शिक्षण सोडून दिलं पाहिजे का - तर उत्तर 'नाही' असं आहे. काही फोटो पाठवत आहे. मी त्याची 'मुलाखत' रेकॉर्ड केली आहे. ती पण बघा. राजाचे खूप आभार. ओमचं खूप कौतुक. समाधानी वडिलांचे खूप अभिनंदन ( अशी पुत्र प्राप्ती )

0/Post a Comment/Comments