आजही मी जंगलाचा तुकडा तोडून घरी आणला, फुलदाणीसाठी - फुलराणीसाठी !
फुलदाणी या शब्दाचा अर्थ आहे - फ्लॉवरपॉट. फुलदाणी हा शब्द पूर्वी, अर्थात पन्नास वर्षांपूर्वीसुद्धा, क्वचितच वापरात येत असे. आत्ता तर तो endangered - या जगातून नाहीसे होण्याच्या धोक्यात आलेला आहे. फुलांशी आणि दाणीशी माझा संबंध सातवी आठवीत असतांना आला होता. एकदा पुष्परचना नामक स्पर्धेत भाग घेतला होता तेंव्हा आणि दुसऱ्यांदा 'चित्रकला' या विषयात अविष्कार करतांना.
काल माझ्या जवळच्या मित्रानं विचारलं - फेसबुक वरील पोस्ट्स बघून - 'काय साठीत पुनश्च एकदा मधुचंद्र?'. गेल्या सात आठ दिवसांपासून मी 'रचना' या नावाखाली दररोज सकाळी फुलं आणि त्यांच्या 'दाणीतील' सजावट यांची पोस्ट टाकत असतो. दररोज मी सायकलिंग करतांना - रस्त्याने अथवा जंगलात - नवीन फुलांचा आणि पानांचा शोध घेत असतो. कारण तिलाही फुलं आवडतात. तीही नेहमी फुलांची विविध पद्धतीने रचना करत असते. फुलांकडे बघितलं की मन प्रसन्न होतं हे नक्की. पण त्या करता त्रास घ्यावा लागतो. माणूस सर्जनशील असावा लागतो. कोणत्याही 'आपण स्वतः' केलेल्या रचनेत आनंद असतो. दोनशे तीनशे रुपये फेकून 'बुके' आणणं यात आनंद कमी आणि शो जास्त. बुके 'वाळून' गेला तर दुःख होत नाही, पण आपण सजवलेली फुलं सुकली की मन 'कातर' होतं .... त्या दुःखातून आपण पुनश्च एकदा 'फिनिक्स' प्रमाणे झेप घेऊ इच्छितो, नवनिर्माणासाठी ...
आठवड्यापूर्वी मी सहज 'जंगलाचा एक तुकडा' तोडून घरी आणला आणि बोरोसिलचं काचेचं भांडं घेतलं. फुलांची आणि पानांची 'अभिनव' रचना केली. तिला ती खूप आवडली. ती 'wow' म्हणाली. दुसऱ्या दिवशी मी हे सर्व विसरून गेलो. घरी 'जंगल तोड' न करता आलो तर ती म्हणाली - फुलं नाही आणली आज? मग मात्र मी तीला आनंद देण्यासाठी दररोज फुलं आणि पानं आणू लागलो - आणि नव्या नव्या रचना शोधू लागलो. तिलाही 'दररोज काहीतरी नवं' मिळतंय हे आवडू लागलो. निसर्गातील रंगांचे अविष्कार मी अनुभवू लागलो. पुष्परचना हा माझा 'छंद' होऊ पाहत होता. चार पाच दिवस मजेत गेले. पण ....
पण एक दिवस घात झाला. आमच्या घरातील नंबर आठचा जो नवसदस्य आहे त्याने - जॉर्जने - म्हणजे कुत्र्याने - मी केलेल्या पुष्परचनेची नासधूस केली. माझा हिरमोड झाला. पण तात्पुरताच. तिचाही झाला. ती म्हणाली - बाबा, उद्या आपण फ्लॉवरपॉट थोड्या उंचीवर ठेवू. म्हणजे जॉर्जचा 'हात' तेथवर नाही पोहचणार.
माझाही आनंद द्विगुणित झाला. आम्ही सर्वजण 'तिला' आनंदात ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत. माझी सून, दीपाली, सध्या 'शल्य चिकित्सेनंतरची विश्रांती' घेत आहे. दिवसभर पडून राहावं लागतं. तिला -'आमच्या फुलराणीला' आनंद मिळावा म्हणून माझा हा प्रयास - या फुलदाणीचा. पण मला तिच्यापेक्षा जास्त आनंद मिळतोय - फुलांच्या / रंगांच्या रचनेतून. दररोज नवीन 'आव्हान' - आज नवं काय करता येईल. तुम्हीं केली आहे का कधी 'रचना - पुष्प रचना'? काही फोटो पाठवतो - बघा आणि ...
कधी पुष्परचना 'तुऱ्यांची' - बोण्ड पण आली त्यांच्या बरोबर. तर कधी - रचना - जांभळ्या रंगाची - आतून पांढरा शुभ्र रंग आणि बाहेरून जांभळा - काय निसर्ग आहे हा?! विलोभनीय - काही कळ्या, काही उमललेली फुलं आणि काही उमलू घातलेली. नंतर पिवळ्या रंगाचा विस्तार मला आवडू लागला. कधी बाभळीच्या झाडांची फुलं आणली तर आज जंगली फुलं आणली. आज भांड बदललं. पारदर्शक भांड वापरल्याने काचेपलीकडचं दिसू लागलं. झाडाच्या शेंगा सुद्धा वापरल्या 'रचनेत'.
मी भरतोय आयुष्यात रंग. चित्र पूर्ण होतंय - आनंदाचं. दीपाली लवकर बरी हो.
Post a Comment