नेमाडे भौ यांना पत्र-भाग १
नेमाडे भौ-प्रमाण भाषेत (प्र भा) भाऊ, नमस्कार,
तुमची ती नवी कांदबरी हाय ना भाऊ - 'हिंदू , जगण्याची समृद्ध अडगळ'- ती वाचायला घेण्यापूर्वी - दोघातिघांना विचारलं 'कशी आहे ब्वा कांदबरी ?' तर माझे प्राध्यापक मित्र म्हणले - 'बरी आहे, खूप पसरट आहे.' मग मी विचारलं - पसरट असल्याने काय होतं? तर आमचा विचारवंत प्राध्यापक म्हणतो - 'वाचतांना जरा कंटाळा येतो. कादंबरीचं ढोबळ मानानं कथासूत्र, प्रमुख पात्रं-प्रसंग वगैरेंबद्दल पूर्वी इतर ठिकाणी बरंच काही येऊन गेलेलं आहे. त्यामुळे पुनरुक्ती करण्याऐवजी नेमाडेंनी काही नवं दिलं असतं तर बरं झालं असतं. 'हिंदू' - स्तुत्य पण फसलेला प्रयत्न’. जाऊद्या भाऊ, टीका जरा जास्तच झाली आहे. मला तर वाटतं - कोणताही धर्म घ्या - तो आपल्याला समृद्धपणे जगूच देत नाही. धर्म आपल्याला गुरफटून टाकतो. गिळून टाकतो. मग बसतो आपण दुसऱ्या धर्माशी भांडत - विनाकारण.
नुकतंच मी चांगदेव चतुष्ट वाचलं, पुनश्च एकदा - हूल, बिढार, जरीला आणि झूल. आधी वयाच्या तिशीत आणि आत्ता साठीत. आत्ता लय भारी वाटलं. त्या प्र भा ला फाट्यावर मारून तुम्ही ह्या चार कांदबऱ्या 'चांगदेव' वर लिहिल्या. गरज पडेल तेव्हां वंगाळ भाषा वापरली. लै भारी भौ. त्यामुळं कसं ओरिजिनल वाटलं लिखाण. लोकं म्हणत्यात कि चांगदेव म्हणजे तुम्हीच. खरं आहे का हो ते?
पण, बरंका का भौ, या चारीभी कांदबऱ्या पसरट हायेतचं. अगदी त्या रशियन डोस्टोवोस्की सारख्या. किंवा 'फिफ्टी शेडस ऑफ ग्रे ' - इ एल जेम्स सारखं. चांगदेवचं एक वर्ष म्हणजे दोनशे पानं. नऊशे पानं म्हणजे पाचसहा वर्ष. पसरटपणा खोल असतो. तुम्हीं सगळी पात्र इतक्या बारकाईनं लिहून काढली कि - तेचं नाव ते. उदा. चांगला देशपांडे म्हटला कि देशपांडे स्वभावासह मी माझ्या मित्रांमध्ये मी शोधू लागतो. छोटा मेंदू मोठा आणि मोठा मेंदू छोटा असे जोशी सर - एकदम भन्नाट. मी शोधतोय असा जोशी. तुमची लिहिण्याची पद्धत भारी - उदाहरणार्थ - एकदा सुरवात केली कि २६०व्या पानावर थांबायचं ! व्याकरण गेलं खड्यात! हवंय कशाला ते? तुम्हांला आलेली अनुभूती वाचकांपर्यंत पोहचली कि भाषेचं काम संपलं. पण पुणेकरांना नाही ना समजत. प्र भा बद्दल अति आग्रही असणं हे साहित्य नवनिर्मितीस मारक आहे असं मला वाटतं. दुसऱ्याला अनुभूती देणं महत्वाचं.
दुसरं असं कि , धर्माविषयी, जातीपाती विषयी, वर्णव्यवस्थेविषयी तुम्हांला पडलेले प्रश्न आणि मला पडलेले प्रश्न सारखेच आहेत. आपला चष्मा एक आहे. प्रोफेसर लोकांमध्ये किती 'वैचारिक' चर्चा होतात हे समजलं (जरा हसा) - तुम्हीं मांडलेल्या प्रश्नांमधून. एक चांगलं केलं - प्रश्नांची रास उभी केली - उत्तरं शोधायचा प्रयत्न नाही केला. नाहीतर खांडेकरांनी त्यांना काय म्हणायचे आहे ते सर्व 'ययातीच्या' तोंडी टाकून दिले 'ययाती' च्या शेवटी. एक बरं झालं, खांडेकरांसारखा तुम्हांलाही 'ज्ञानपीठ पुरस्कार' मिळाला. मराठीत जसा तुकाराम आहे, नामदेव ढसाळ आहे तसा भालचंद्र नेमाडेसुद्धा आहे, असं पु. ल. देशपांडे व दि. पु. चित्रे सातत्याने सांगत होते. त्यावर आता ज्ञानपीठ पुरस्काराने शिक्कामोर्तब केले आहे.
या चार कादंबऱ्या म्हणजे त्या 'काळाचा' तो स्क्रीन शॉट आहे. तुमच्या कांदबऱ्या 'काळाच्या आड' लवकर जातील. किंबहुना त्या गेल्या आहेत. सत्तर ऐंशीच्या दशकात कॉलेजं कशी असायची याचं ते 'दस्तऐवजीकरण' आहे. आपली पिढी संपली कि त्याचं महत्व संपलं. 'साहित्य मूल्य' वैगरे असं काही नाही ... ययातिची गोष्ट मात्र 'मूल्ये' सांगून जाते. हा उहापोह करण्याचं कारण म्हणजे - एक विचारवंत प्राध्यापक मला म्हणाला - अरे नेमाडे काही देतच नाही! असो.
घेतो आत्ता 'हिंदू' वाचायला. सुभाष अवचटांनी मुखपृष्ठ सुंदर तयार केलं आहे. काळा पिवळा आणि लाल रंग वापरलाय. मूड झाला तर 'हिंदू' वर टिपण्णी करीन. खंडेराव काय म्हणतो ?
आपला वाचक , मानकर.
हिंदू !? - गोंधळ घालतायेत नेमाडे!
मित्रांनो मान्य करतो कि 'हिंदू कादंबरी' संपवल्यानंतर मी पूर्णपणे गोंधळून गेलो आहे. गोंधळाची चव गोंधळासाठी केलेल्या मटणावर अवलंबून असते. रस्सा झणझणीत असेल तरच मजा येते, अन्यथा नाही. पण या नेमाडेंच्या गोंधळात ... सर्व .... बेचव? असं नेमकं नाही म्हणता येणार. सहाशे तीन पानं वाचतांना दमछाक होऊन जाते. ''कादंबरी लई म्हंजे लई पसरट हाये. बोट दिलं कि हाथ पकडते, तसा प्रकार ! माणसांनी काय नुसतं वाचीतच बसायचं. नेमाडे मुद्दा लवकर मांडा असं म्हणायची वेळ आली.''
कोणतंही पुस्तक वाचायच्या आधी पुस्तकाचं नाव आणि उपनाव आपल्याला काही सांगत असतं आणि त्यानुसार आपण अपेक्षा करत असतो. 'हिंदू - जगण्याची समृद्ध अडगळ' यावरून मला वाटलं कि हिंदू धर्मामुळे जगण्याची काही ससेहोलपट होत असेल त्याविषयी काही उहापोह असेल. पण तसं काही नाही. तरीही मला पुस्तक आवडलं कारण लेखकाने त्याची अनुभूती आणि अनुभव ओतले आहे. स्वानुभावाशिवाय हे शक्य नाही. सुंदर नाजूक त्वचेच्या खाली चित्र विचित्र हाडे आणि सांधे असतात - नेमाड्यांचं वाक्य ! जळजळीत विधर्भीय वास्तव आहे हे.
आपण हिंदू म्हणून जो जन्म घेतो तो आपल्या बापाच्या धर्मानुसार आणि मग सर्व परंपरांचा भाग होऊन जातो - कितीही अडचण झाली तरी धर्म लवकर सोडत नाही. जेंव्हा जीवनमरणाचा प्रश्न उद्भवतो तेंव्हाच 'आपला धर्म अडगळ वाटू लागतो.' तेंव्हा मृगजळाच्या मागे धावून काही धर्मांतर करतात बहुदा!' - असं काही म्हणायचं का, लेखकाला ? - तर तसंही नाही.
तरीही पुस्तक मला आवडलं आहे. याचं एक कारण कदाचित असंही असू शकेल - नेमाडेंनी खेड्यांमधील १९५०/६० च्या दशकातील जी वर्णनं केली आहे ती फार अचूक आहे. त्यांनी लिहिलेलं मी बरंच अनुभवलेलं आहे. वयाच्या पाच ते पंधरा वर्षांच्या दरम्यान मी बराच वेळ नासिक जिल्ह्यातील मोहाडी, ओझर आणि वणी या लहान गावात घालवला घालवला आहे. कार्यरत वर्णव्यवस्था जवळून पाहिली आहे. नशिबानं आमचे आजोबा पणजोबा सधन होते. शेती आणि व्यापार ( कापड दुकान ) यात उत्तम पैसा मिळत होता. घर धन आणि धान्यानं भरलेलं असायचं. दूधदुभतं मुबलक होतं. त्या काळी शके १८६६ साली आमच्या पंजोबानं रुपये १२५ कृष्ण मंदिर उभारणीस दिले होते. मुख्य म्हणजे तेंव्हा मी संवेदनशील होतो आणि इतरांची गरिबी बघत होतो. 'हातावरचं पोट' हि जगण्याची अपरिहार्यता फार भयकारी असते. गरिबांकडे सुख मुक्कामास येतंच नाही. त्या काळी जे मनात झिरपलंय त्याचा पुनरानुभव मी कादंबरी वाचतांना घेत होतो. तेंव्हा मला हिंदू धर्म अडगळीचा नाही वाटला बुवा. या तीनही खेड्यातील हिंदू आणि मुस्लिम गुण्यागोविदानं नांदत होते. दलित, बुद्ध औषधापुरते होते,खालच्या आळीत - आणि ख्रिश्चन तर नव्हतेच. पूर्वीच्या साधेपणात समृद्धी होती. धनमत्सर नव्हता. कुटुंबाशी जोडलेले महारमांग, सुईणी, दूध काढणारे, भरेकरी, बामन, भंगी, बोहारिन, खाटीक सुद्धा पिढ्यानपिढ्या पुढे जात होते, एकमेकांच्या बरोबर. देवांच्या मुखवट्यांच्या मिरवणुकीत, आमच्या आजोबांना 'अग्रक्रम' दिला जायचा. ते 'पाटीलकी' करायचे. म्हणून कदाचित आम्ही 'मानकरी'. हि कादंबरी वाचणाऱ्याला थोडा तरी खेड्याचा स्पर्श असायला हवा, तरच कादंबरी 'उमजते'. लिखाणात 'अनुभवांची तीव्रता' अफाट आहे. आणि एक लक्षात आलंय - धर्मबरोबर जात सुद्धा अतिशय महत्वाची होती, तेंव्हा. आत्ता जेंव्हा या गांवाना भेट देतो तेंव्हा विचित्र वाटतं. उदाहरणार्थ मोहाडी येथे सोमवंशीयांची गढी जमीनदोस्त झालीय, फक्त वाड्याचा दरवाजा, जवळवळ पंचवीस फुटांचा, लाकडावरील नक्षीसह उभा आहे, भग्न अवस्थेत. तट पूर्ण कोसळले आहे. गावकरी हल्ली वाडा हागण्यास वापरतात. माझं लहानपण अश्मयुगात जमा होतंय असं वाटतं, कादंबरी वाचतांना. कधी कधी ह्या आठवणी 'व्रण' सोडून गेल्या ....ताटं गेली ताटल्या राहिल्या.
माझ्यात आणि नायकात, खंडेरावात, मला साम्य दिसायला लागलं. हि कांदबरी नाहीच जणू. एका कुटुंबाचा आधार घेऊन समाजावर केलेलं मनन चिंतन आहे. कथा आणि नाट्य नाही. नुसते प्रश्न विचारायचे का? विशेष घटना घडत नाही पण वर्ण व्यवस्थेचे परिणाम मात्र दिसतात. काही काही वाक्य खूप खोल अर्थ व्यक्त करतात - उदा. - स्मशान शेवटी मानवी भूगोलाचा अपरिहार्य भूभाग असतो - खंडेराव , उत्खनन करणाऱ्याच्या तोंडी दिलंय. विदर्भातील धग मात्र चांगली जाणवते.
वाचकहो किंवा नेमाडे भाऊ, मला कृपाकरुन सांगा, या पुस्तकाला जे नाव दिलं आहे, ते का दिलं आहे? या अशा नावामागे काय प्रयोजन आहे? नुसता गोंधळ. 'भडक' नाव दिले कि आपोआप चर्चा आणि जास्त खप पुस्तकाचा.
या पुस्तकाचे नाव 'खंडेरावची बखर' असं असायला हवं. माझं हे म्हणणं एखादे वेळेस चुकीचंही असेल पण उद्देश मात्र सरळ आहे. बखर म्हणजे बऱ्यापैकी अभ्यासू ...खूप लहान लहान संदर्भ .. नोंदी देणारा ग्रंथ.
पान क्रमांक ५४६ - ५४७ वर केलेल्या टिपण्या म्हणजे ६०३ पानांच्या फापट पसाऱ्यात, पसरट पसाऱ्यात लेखकाला काय म्हणायचे आहे ते समजते. हो प्रत्येक लेखकाला 'काहीतरी' म्हणायचे असते(च), हो कि नाही भौ (नेमाडे). इथे लेखक म्हणतो कि ' आपला मस्तकापुढचा मेंदू अवास्तव मोठा झाल्याने मागचा लहान मेंदू संकुचित पावत चालला आहे. तो लहान मेंदू मोठा करणं आणि पुढील मोठा मेंदू लहान करणं अशी प्रती-उत्क्रांति होणं गरजेचं आहे. आपला प्रवास संवेदनबत्थडतेकडे चालला आहे'. काय भन्नाट विचार. हे समजण्यासाठी आपल्याला छोटा अन मोठा मेंदू नक्की काय काम करतो हे माहित पाहिजे.
पण मी काय म्हणतो - हे पुस्तक वाचलंच पाहिजे असं काहीही नाही. पण तरीही वेळ असेल तर वाचाचं एकदा. होऊन जाऊदे टाईम पास. बखरीचा शेवट मात्र - कविकुलगुरू मिर्झा गालिब यांच्या 'चिंतनानं (कि चिंतेनं?)' होतो -
*आहे कुठे आकांशाचं दुसरं पाऊल देवा,
आम्हांला या शक्यतांच्या रानात एकच पावलाचा ठसा मिळाला !*
गालिब सहाब - हम विनाश कि तरफ जा रहे है ...थांबतो येथे. नाहीतर तुम्हीं म्हणाल 'मानकर पण पसरट लिहितात'
Post a Comment