Book Review - डोह - मी श्रीनिवास विनायक कुलकर्णी

 

डोह - त्यांचा आणि माझा

नुकतंच मी श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांचे 'डोह' नावाचे पुस्तक वाचले. १९६५ मध्ये त्यांनी ललित लेखन केले आणि बहुदा आयुष्याच्या उत्तरायणात आपल्या लहानपणीच्या आठवणी त्यांनी मांडल्या. त्यांच्या आठवणी अजूनही किती ताज्या आहेत याचा अनुभव वाचक घेत घेत विविध रंगांचा जागर होतो. ललित लेखांचं हा समृद्ध प्रकार आज पन्नास वर्षानंतर चर्चिला जातोय त्याच्यातच त्याचं ' सुंदरत्व ' आहे - चिरकाल टिकणारं. कुलकर्ण्यांचा 'डोह' खोल आणि अथांग आहे.

११५ पानाचं पुस्तक वाचण्यास मला ६ दिवस लागले. कारण - मी माझ्या डोहात डोकावत होतो. सारखं सारखं. कुलकर्ण्यांच्या बाबतीत जे घडलं ते माझ्या बाबतीत कसं झालं या चाचपणीत माझा वेळ जाऊ लागला, वाचतांना. कधीकधी मी माझ्या डोहाच्या तळात अडकून बसे आणि मग कुलकर्ण्यांची अक्षरे दिसेनाशी होत आणि मग .... आनंदाचे डोही आनंद तरंग.

मला वाटतं प्रत्येकाचा आपला एक डोह असतो. खरंतर आपण आईच्या गर्भरूपी डोहातून बाहेर येतो आणि आपला स्वतंत्र डोह तयार करायाला सुरवात करतो. किंवा आपला डोह आपोआप निर्माण होत असतो. आपण कुठे जन्म घेतला यावर बरचसं अवलंबून असतं - म्हणजे डोहाची लांबी,रुंदी,खोली,नितळता आणि बरंच काही. साधारण साठी नंतर , वेळ मिळाल्यावर आपण डोहात डोकावू लागतो. प्रवास सगळे जरी करत असले तरी प्रवास वर्णन थोडेच करतात. तसंच आपल्या डोहात काय आहे ते फार कमी लोक सांगतात.

*माझ्या डोहात मोहाडी नावाचं गाव आहे. नासिक पासून अठरा मैल अंतरावर. दहाव्या मैलांवरून उजवीकडे वळायचं. १९६५-७० च्या दरम्यानचा हा काळ. माझ्या डोहातील संदर्भ म्हणजे - श्री कृष्णाचे मंदिर, बोहाडा - मुखवट्यांची जत्रा , आमच्या आजोबांची भाऊबंदकी आणि ती भांडणं, माझ्या काकाचं लग्न आणि ती वरात , चेहेडी नावाची नदी, पुढारी आजोबा आणि त्यांची बंदूक, आमच्या मालकीचं खंडेरावाचं मंदिर, १८७५ साली आमच्या खापर पंजोबानी दिलेली देणगी, अंधारातील मोहाडी, माझ्या आत्याचे स्वयंपाक घर, बस स्टँड पाठीमागील तलावात माझ्या काकांचा मृत्यू आणि ती शेतातील गूढ विहीर. आणि हो लिंगायत समाजाचं स्मशान तर राहिलं. पुस्तक वाचतांना तळ ढवळून निघाला. कुळकरण्यांप्रमाणेच मी हि माझ्या डोहाचे अंतरंग बघू लागलो. गेल्या पन्नास वर्षांमध्ये काही माणसे ढगाआड गेली असली तरी आज मी त्यांच्याशी बोलत आहे.

वाचकाला सिहांवलोकन करायला भाग पाडणारं हे पुस्तक आहे. हे त्या पुस्तकाचं यश आहे. मी पण ठरवलं. करोना संपला कि मोहाडीला जायचं आणि प्रत्यक्ष डोहात बुडी मारायची. 'उरलेल्या' लोकांना भेटायचं. त्यांच्याशी बोलायचं. आणि डोहात बुडून लिखाण करायचं. मी बऱ्याचदा मोहाडीला मयत, दहावा, लग्न या निम्मिताने जातो. पुढच्या वेळी फक्त 'डोह' हे निम्मित. सोमवंशी यांचा वाडा परत बघायचा. मुख्य म्हणजे मुक्त फिरायचं. वेगवेगळ्या ओट्यांवर बसायचं. जुन्या कथा परत उगाळून घ्यायच्या.*

हे वाचत असतांना तुम्हीं तुमच्या डोहात बुडाला असाल तर मला आनंद आहे कारण - आनंदाचे डोही आनंद तरंग ....

*तुमचा, माझा , त्याचा आणि तिचा. अथांग डोह ! परिपूर्ण आहे का? की आयुष्याच्या अंतापर्यंत अपूर्ण. की पूर्ण-अपूर्णतेच्या पलीकडचा? अनेक प्रश्नांचे तरंग उठतात, हे 'ललित' वाचतांना. जसा माणसाचा स्व-भाव तसा त्याचा डोह. डोहात जे काही उपजते ते लय पावते का? नाही !  आठवणींचा जागर केव्हाही, कसाही ... आणि अपसूक होतो. * कधी कधी डोहात बुडायला भीती वाटते. कारण तळाशी गेलं की फक्त अंधार. *

मंडळी तुम्हांला जर दुसऱ्याच्या डोहात उडी मारायची असेल तर वाचा - प्रभा खेतान याचं आत्मकथन - अन्या ते अनन्या. फार ..... नाही सांगत. वाचाच. दिग्मूढ व्हाल. विचाराल - असाही डोह असू शकतो ? 

थांबतो आता.

0/Post a Comment/Comments