सापेक्षी संपादक (आठवा हंस, मोहिनी, नवल ही १९७० च्या दशकातील मासिके) म्हणून प्रसिध्द असलेले आनंद अंतरकर गेले हीलोकसत्तेमधील बातमी ऐकून मला किंचित दुःख झाले. किंचित या करिता - कारण ते माझ्या जगात नव्हते म्हणून. पण आज ते मनातघर करून थांबले आहे. अंतरकरांची मोठी बहीण, लेखिका अनुराधा औरंगाबादकर, वय वर्षे ८४, (या पुढे मी त्यांना काकी म्हणणार) यामाझ्या जगातल्या. कारण १९७०/८० च्या दशकात त्या आमच्या बिल्डिंगमध्ये राहायच्या. वि वा, अ वा (वर्टी), कानेटकर यांचीपुस्तकातून जेंव्हा ओळख होत होती तेंव्हा या लेखिकेचा सहवास आम्हांला लाभला. त्यांचं खूप काही ललित लिखाण 'दैनिक गावकरी' मध्ये यायचं. मी ते लिखाण वाचायचो पण मी काकींबरोबर चर्चा केली नाही कधी. त्त्यावेळी त्यांच्या लिखाणाचं मला किंचित अप्रूप होतं. त्यांनी कधीही आमच्यावर 'लेखिका असल्याचा भास' मारला नाही. अत्यंत साधी आणि मनमिळाऊ 'काकी' मला तेंव्हा खूप आवडायची. मी तेंव्हा सातवीत आठवीत असेन. कुठेतरी लिखाणाचे सूक्ष्म संस्कार होत असतील का? असा विचार आज येऊन गेला.
महिन्याभरापूर्वी अचानक मनातील आठवणी जाग्या झाल्या - कारण काहीही नव्हते, तरीही. त्यांच्याशी बोलावसं वाटलं. त्या सध्यापुण्याला असतात. त्यांचा फोन मिळवला आणि बोललो त्यांच्याशी, पंचेचाळीस मिनिटे. स्मरणरंजनात दोघेही दंग झालो होतो. चाळीसवर्षांपूर्वीच्या आठवणी, खोलवर रुतलेल्या, चटकन डोहाच्या पृष्ठभागावर आल्या. अनेक तरंग आणि अनेक छटा. काकींना खूप छानवाटलं, मी आठवण 'काढली' म्हणून. त्यांच्या बोलण्यात तो आनंद मला 'दिसत' होता. पण फोन ठेवल्यावर माझं मन सुन्न झालं, विषण्णझालं. काकींची तब्बेत बरी नसते, हृदय खूप कमी साथ देतंय. पण सगळ्यात शॉकिंग म्हणजे - डोळे पूर्णपणे साथ देईनासे झाले - डोळ्यासमोर 'ठार' अंधार असतो म्हणे - चोवीस तास. लेखिकेला लिहिता-वाचता न येणं !? या पलीकडे दुःखं नाही. एक बरं आहे 'ऐकता' येतं.
आज काकींचा लहान भाऊ गेला म्हणून सांत्वनासाठी फोन केला. कल्पनेनंच मी काकींना बघत होतो. दिसत नसल्याने त्या माझा फोनकसा घेत असतील? भावाच्या दुःखातून सावरलेल्या वाटल्या. मला बरं वाटलं. मग आम्हीं त्यांच्या चार पाच वर्षांपासून 'न दिसणे' यादुःखावर बोलू लागलो. विषय त्यांनीच काढला - बहुदा त्यांना काही सांगायचं असेल. बोलता बोलता त्यांनी मला एक सुखद 'अनोखा' अनुभव सांगितला. साधारण सत्तर पंच्याहत्तरीची त्यांची एक मैत्रीण नासिक रोडला राहते. नाव - सुनंदा वर्तक. या पुढे त्यांना काकूसंबोधीन. काकू सुद्धा लेखिका. पण जास्त 'समाज सेवक'. काकूंनी पदराला खार लावून समाजसेवा केली. उदाहरणार्थ - दीड लाख रुपयेखर्च करून कोणत्यातरी गावाला पाणी तळे खोदून दिले.
अनुराधा काकी सांगत होत्या 'अरे अनिल, दोन वर्षांपूर्वी सुनंदाला जेंव्हा कळलं की माझे डोळे निकामी झाले तेंव्हा ती खूप रडली. पणतिने तत्काळ निश्चय केला - मला मदत करायचा! माझं आंधळेपण 'सुसह्य' करायचा. गेली दोन वर्षे, दर गुरुवारी आणि रविवारी, दुपारीचार वाजता मला फोन करायची आणि दोन तास, म्हणजे सहा वाजेपर्यंत निवडलेलं नवं जुनं साहित्य वाचून दाखवायची. न चुकता हाउपक्रम दोन वर्षे चालला. खूप मजा यायची. मी आतुरतेने चार ची वाट बघत असे .....पण ..'
काकी थांबल्या. बहुदा दम लागला असावा. मीही इकडे भारावून गेलो होतो. सुनंदा काकू यांच्या मदतीच्या भावनेने मी इतका आनंदीझालो होतो की काही प्रतिक्रिया देण्यास मी असमर्थ होतो. हतबल होतो. काय बोलावं ? सुचत नव्हते. त्यात काकींच्या 'पण' मुळे मीव्याकुळ झालो. काही 'अनिष्ट'? असेल का पुढे?
'काकी 'पण' काय? काय झालं' मी विचारलं.
काकी, बहुदा आवंढा गिळून आणि डोळे पुसून - दिसत नसलं तरी डोळ्यातून पाणी येत असेलच की - म्हणाल्या - 'अरे अनिल, दोनमहिन्यांपूर्वी सुनंदा गेली. तिला कॅन्सर ने गाठलं'.
परत काकी थांबल्या. मी निशब्द. मनात म्हटलं - हल्ली 'चांगल्या' लोकांनाच कॅन्सर होतो. समाजसेवा करूनही कॅन्सर? असं का? देवा? - भ्रष्ट लोकांना का नाही देत हा 'नजराणा'?
*काकी - 'अरे तिला जिभेचा कॅन्सर झाला होता. तिची जीभ कापावी लागली. मरण्याआधी दोन महिने तिची 'वाचा' गेली होती. तिचं'वाचणं' बंद झालं आणि माझं 'ऐकणं'. *
फोनच्या दोन्ही टोकावर 'निःशब्दता' होती. काकी आणि काकू यांच्यात प्रचंड अंतर पडलं होतं. अंतर तयार करणारी नियती बहुदा हसतअसेल पण आम्हीं दोघे मात्र .... व्याकुळ होतो. फोनवरची 'शांतता' आमच्यातील अंतर वाढवीत होती.
अचानक मी म्हणालो 'काकी मी नंतर बोलतो'
काकी म्हणाल्या 'हो चालेल. पण नक्की फोन कर'.
मी हि तत्काळ निश्चय केला 'पुण्याला जायचं, काकींना भेटायचं आणि माझे ब्लॉग्स वाचून दाखवायचे'.
तितक्यात खोल मनातुन प्रश्न आला ' पुण्याला कशाला जातोस. फोन आहे की ! तुला नक्की 'सुनंदा' होता येईल.'
सुनंदा - पार्वतीची एक मैत्रीण. होतो मी 'सुनंदा'.
फोटो - व्हाट्सअप मधून एक फॉरवर्ड आला आहे. सुनंदा अशी दिसत असेल का? स्वस्तिकमय.
Post a Comment