चप्पी गोटा
संथ जलाशयात अलगद एक खडा टाकावा आणि तिथून असंख्य गोल गोल वर्तुळं दूर दूर जात रहावत तसं - वाटतंय मला. दादा ( माझाभाऊ ), तुझा मृत्यू एखाद्या खड्यासारखा - तुझ्या मृत्यूने डोहात 'विचारांची - किंबहुना आठवणींची' उलथापालथ झाली. तुझ्या'अंत्येष्टिला' आज दहा दिवस झाले. आम्हीं गंगेवर आलो आहे. आज सर्वांनी क्षौर केले आहे. केवळ तुझ्या बद्दलची कृतज्ञता, भावना, प्रेम म्हणून. तुझ्या 'नावाने' क्षौर केले म्हणजे आता तुझे येथे काहीही शिल्लक राहिलेले नाही (आठवणी वगळता). आता तु पुढच्यामार्गाने सद् गतीला जा. कावळा पिंडाला पटकन शिवला ...
मला खात्री आहे, तू जर इथे असता तर तू चकोटावर टपली मारली असती, गंभीर वातावरणात तू काहीतरी विनोद निर्मिती केलीअसती, इतरांचे गोटे पाहून मल्लीनाथी केली असती. पण नंतर म्हणाला असता 'अनिल आपण यांचे फोटो काढू'. नंतर फोटोहीकाढले असते. तुझ्या कडून फोटो काढून घेण्यात सर्वांना अपूर्वाई (विलक्षणपणा; असाधारणपणा ; उत्कृष्ठपणा; अत्यंत चांगलेपणा) वाटायची. याला सर्व आता मुकणार !
तुला मृत्यूची 'चाहूल' लागल्यावर ... हो ती लागली होती ... पण आपण बोलत नव्हतो इतकंच. तू मात्र वेगळ्यारीतीने ते सांगत होतास. कोणीही भेटायला आलं की तू म्हणायचा - 'हे चित्र घेऊन जा माझी आठवण म्हणून'. आपण दुसऱ्याच्या आठवणीत राहावं ही मानवाची'अंतिम इच्छा' असावी बहुदा. तू मला ते 'खिडकी आणि फुलांचा वेल' चित्र दिलंय ना, ते मी अगदी समोर ठेवलंय. तू राहशील माझ्यास्मृतीत, दीर्घकाळ. तुझ्या चित्रात 'तू' आम्हांला दिसत राहशील - मला, प्राचीला, पूजा-अर्चाला, ऋषी आणि नंदूला.
यार दादा, आपलं ते 'पृथ्वीवर येणारी मेनका' प्रोजेक्ट झालंच नाही का रे? तुझी इच्छा असूनही तुला ते चित्र काढायला जमलंच नाही. त्या चित्रासाठी मी घरात एक भिंत राखून ठेवली होती. पण आता ... ? मी एक काम करतो. तुझे जे ओपन केलेले पण न संपलेले रंगसचिन कडून घेतो. एखादा कॅनवास तुकडाही घेतो. अन 'कोलाज' काढतो. नुसते रंग ओततो रे. आठवणींसारखे ओघळू देतो. त्यांना लयदेण्याचा प्रयत्न करतो. आपोआप येणाऱ्या 'ओघळाला' मी डिस्टर्ब नाही करत. थांबेल तेथे थांबेल. मला टेक्सचर हवंय - थ्री डी इफेक्टहवाय. पण मी माझी सर्जनशीलता नियंत्रित करतो. उगीच क्राफ्टिंग नको. रंगांचा अविष्कार नैसर्गिक हवा. रंग मात्र मी ठरवणार. तुझाआवडता यलो ऑकर वापरणार. तू मला आता विचारतोय - अनिल बॅग्राऊंड कोणती घेतो? 'अरे ब्लॅक अँड व्हाईट शिवाय पर्याय आहेका? हे रंग नाही ... तर या छटा आहे ... शेड्स ऑफ ग्रे' असं माझं उत्तर. मी चित्राचं ओरिएंटेशन आडवं ठेवतो. ओघळ वरून खाली येताततर माझे 'ओघळ' उजवीकडून डावीकडे वाहतील. मग ते चित्र 'ऍबस्ट्रॅक्ट' होईल. बघणारे चित्र बघितल्यावर माझ्याकडे प्रश्नार्थक मुद्रेनेबघतील. कोणीतरी विचारेल 'अर्थ काय?'. मग मी 'विचारवंताचा' आव आणीन अन सांगेन 'हे नीरर्थक अशा आयुष्याचे चित्र आहे'. प्रश्नविचारणारा बुचकळ्यात पडला आहे अशी खात्री झाल्यावर, मी म्हणेन - 'अरे - याचा अर्थ काय त्याचा अर्थ काय? हे प्रश्न मुळी अर्थहीनअसतात. कोणाकडेच त्याची उत्तरें नसतात. नुसतं अविष्काराकडे बघ, जमल्यास क्षणिक आनंद घे. नाहीतर विषय सोडून दे. अरेप्रत्येकाला नाही कलाकार होता येत.' असो. माझा शब्दमांजी आशय ग्रंथुन (गुंफून) खूप झाला (ना?).
दादा मला आशीर्वाद दे असा की 'जे जे सुंदर आहे त्याचा मी ध्यास घेतला पाहिजे.' 'दादा, खरं सांग, मी आहे का रे किंचित तरीकलाकार?' - असं विचारत असतांना .....
सुनीलने मला आरोळी मारली - 'अनिल चल, जेऊन घे. दादाचा प्रसाद घे'. शांताराम दादाचा प्रसाद. माझ्या मोठ्या भावाच्या 'दहाव्याचा' प्रसाद. पिवळाधम्मक, मोतीचूर लाडू.
Post a Comment