हळद

हळद 

'मान्या, तू सप्तरंगी माणूस, आज हात पिवळे कसे? तेही साठीत?' - माझा मित्र म्हणाला. त्याचा 'बोहचकपणा' माझ्या लक्षात येऊनही मी त्याला 'नीट' उत्तर दिले. पिवळ्या रंगाविषयीचे कथाकथन हे असे - अरे काय झालं .... म्हणून सुरवात ...

चार महिन्यांपूर्वी काही फुलांची रोपं घेण्यासाठी मी माझ्या जीवनकाकूंकडे गेलो होतो. रोपं देतांना त्या म्हणाल्या 'अनिल या दोन काड्या घेऊन जा - हळदीच्या आहे'. मला हळदीत इंटरेस्ट नव्हता, तरीही न बोलता घेतल्या अन घरी कुंडीत लावून टाकल्या. काड्या दररोज वाळत चालल्या होत्या ... पिवळ्या पडत चालल्या होत्या. या अशक्ताकडे मी लक्ष दिले नाही पण इतरांबरोबर त्याला पाणी मात्र मिळत होते. इतर रोपांनी 'जीव' धरला होता आणि मला 'फुलरूपी' आनंद देत मिळत होता. 

आज हळदिची काडी पूर्ण सुकली असल्याने मी ती काढून टाकण्याचा प्रयत्न केला तर ... माती पूर्ण हालली ... मी अजून जोर लावला तर काडीबरोबर हळदीचं बुटुक बाहेर आले. मग आणखीन 'उकरंल' तर ओल्या हळदीचा खजिना सापडला. आम्हां उभयतांना 'मोठा आनंद जाहला'. मी हळद स्वच्छ केली आणि मालमत्ता पुढील सोपस्कारासाठी उल्काकडे सुपूर्त करतांना म्हणालो - 'मस्त लोणचं कर'. त्यावर तिने बॉम्ब स्फोट केला - 'म्हणाली 'मला वेळ नाही. काय करायचं ते करा'.  मीही पेटलो होतो - म्हटलं 'चॅलेंज? मंजूर! मी करतो लोणचं'.  

आनंदाच्या भरात खूप कष्ट केले. सर्वप्रथम हळदीची सालं काढली. कंबर खूप दुखले. पण ... हू कि चू नाही. नंतर 'मन-मान-पाठ' एकत्र करून हळद 'किसली'. खूप त्रास होत होता. झक मारली अन झुणका खाल्ला या म्हणीचा अर्थ उमगत होता. 'सहन होत नाही अन सांगताही येत नाही' ह्या अवस्थेचा अनुभव घेत होतो. उल्काला सांगितलं असतं अन प्रयोग मधेच सोडला असता तर ती कदाचित किंचित आनंदी झाली असती. माझा 'अहंम' मोठ्या प्रमाणावर दुखावला असता. 'किसा-किशी' झाल्यावर एक लक्षात आलं कि 'उल्काचा किस घेतल्या शिवाय काही खरं नाही. लोणचं कसं 'घालायचं' हे मला माहित नाही. मी म्हणालो 'उल्के समोर उभी रहा आणि लोणच्याची रेसिपी सांग. मी शूटिंग करतो'.  व्हिडीओ घेतल्यावर कळालं की लोणचं कसं घालतात. आता शेवटच्या क्षणी माघार न घेता 'लोणचं घातलं'.  तुमच्यासाठी 'लोणच्याची' कथा पाठवत आहे. गोड करून घ्या. मी विजयी झालो. विजयात 'उन्माद' असतो का? तर 'असतो'. एक वेगळा आनंद मी अनुभवत होतो. आता हा आनंद बाटलीत भरला अन 'मुरवत' ठेवला. 

'प्रवीण, बासष्ठाव्या वर्षी तुम्हीं लोणचं घालणार आहात' असं कोणी ज्योतिष्याने सांगितलं असते तर मी त्याला उडवून लावले असते. पण आज ही परिस्थिती आहे. आजही मी माझे आयुष्य 'सप्तरंगी' करतो आहे. 'जमत कसं नाही? मलाही हे जमलंच पाहिजे' हा हेका धरून पुढे काहीतरी केलंच पाहिजे - म्हणून आज लोणचं केलं. उद्या काय करीन याचा भरवसा नाही. 


पिवळा रंग आणि तुम्ही : लक्ष्मीचा प्रिय असतो पिवळा रंग. असे मानले जाते की बुद्धीच्या विकासाचा प्रतीक पिवळा रंग अभ्यास, कॉन्सनट्रेशन आणि मानसिक स्थिरतेसाठी फारच उत्तम आहे. तर आता तुम्हीं जाणून घेतलंय की .... तुम्हीं कधी घालताय लोणचं? 


 

0/Post a Comment/Comments