*न छापलेला 'अर्थ'*
या वर्षाच्या सुरवातीस लोकसत्तेने 'तुम्हांला उमगलेला आयुष्याचा अर्थ' या विषयावर लेख मागितले होते. मी महिन्याभरापूर्वी संपादकालालेख पाठवला. पण त्यांनी तो छापला नाही. कारण? 'कळले नाही. ते सांगत नाही'. म्हणून तो तुम्हांस पाठवत आहे. गोड मानून घ्या.
एक ब्लॉगर, एक पांथस्थ , प्रवीण मानकर!
------------------
*वळणमयी - आयुष्य ?!*
'भले बुरे जे घडून गेले, विसरून जाऊ सारे क्षणभर, जरा विसावू या वळणावर' असं कधीच होत नाही. साधारणतः साठी ओलांडली कीमाणूस सिंहावलोकन करायला सुरवात करत असावा - अगदी जाणीवपूर्वक. अर्थात मनातल्या मनात. आपण आयुष्य 'परिपूर्ण' जगलोका? असा प्रश्न स्वतःने स्वतःला विचारलेला असतो. 'साठी' हे आयुष्यातील अपरिहार्य वळण. या वळणाआधी कोणीही सामान्य माणूस'आयुष्याचा अर्थ' शोधण्याच्या भानगडीत पडत नाही.
आयुष्य ही एक अनुभवांची पायवाट आहे असं समजलं तर तिच्यात अनेकदा वळणं येतात, चौरस्त्यावर निर्णय घ्यावे लागतात - सरळजायचं की डावीकडे की उजवीकडे. ही वळणं सार्वत्रिक असतात अगदी लहाणपणीपासून - तरुणाईतून - ते साठीपर्यंत आपल्यापाचवीला पुजलेली असतात. त्या त्या वेळी घेतलेले निर्णय हे सर्वस्वी आपले असतात आणि म्हणून त्यांची 'जबाबदारी घेणं' हे हीअपरिहार्य. बरीच 'वळणं' आपलं आयुष्य आमूलाग्र बदलून टाकतात. कधी चांगल्या तर कधी वाईट दृष्टीने. प्रत्येक वेळेस आपल्यालाकाहीतरी 'उपरती' होते. साक्षात्कार होतो. कधीतरी पश्चातापही होतो. मग या 'उपरतीचा' आपल्याला पुढच्या वळणावर उपयोग होतो. यासगळ्या वळणांकडे समग्ररित्या पाहिलं की 'कदाचित' आपल्या आयुष्याचा 'अर्थ' लागू शकतो.
सातवीत मला चाळीस पैकी सात मार्क गणितात मिळाल्यावर बापाने माझ्या कानाखाली लगावली. दुसऱ्या दिवसापासून आमच्या'गणिताच्या सौ. साबणे बाईंनी' सर्व विशेष अधिकार वापरून माझं जीवन दखलपात्र करून टाकलं. या वळणावर मी ब्राह्मणांची मुलंकसा अभ्यास करतात याचा अभ्यास केला. आणि मग यश माझ्या पाठीमागे लागलं. नकळत माझे मित्र माझे गुरु झाले. मला खरं तर जेजे स्कुल ऑफ आर्टस्, मुंबई येथे चित्रकलेचं शिक्षण घ्यायचं होतं पण आजी म्हणाली 'नाशिकमध्ये जे असेल तेच शिक'. मी चित्रकलाहा विषय संपवून टाकला. आजीचा अट्टाहास - हेही एक वळण. इतरांनी निर्णय घेतला होता.
दुसरं वळण कॉलेजमधील. अकरावीत आल्याबरोबर शेजारचे शिंदे काका माझ्या पाठीमागे लागले - मला सांगायचे की - तू आय. सि. डब्लू. ए. ला प्रवेश घे. मी गंमत म्हणून घेतला आणि चक्क 'पदवीधर' होण्याआधी मी 'निम्मा' कॉस्ट अकाउंटन्ट झालो होतो. इथे मलाआत्मविश्वास मिळाला, शहाणीव मिळाली. नि:शब्द जाणिवा मनापासून अंतरात्म्यापर्यंत जातात. 'शहाणीव' याच मार्गावरतीवास्तव्याला असते. शेजारीपाजारी गुरु झाले. आपण 'काहीतरी करू शकतो' ही भावना बळावली.
वयाच्या विसाव्या वर्षी मोठ्या कंपनीत छोटी नौकरी लागली. १९८२मध्ये नवीन संगणक कंपनीत इतर कोठे ठेवायला जागा नव्हतीम्हणून तो माझ्या टेबलाजवळ ठेवला. मी त्यावर यशस्वी 'प्रयोग' करू लागलो. हे बघून कंपनीनं मला 'डिप्लोमा' साठी कॉलेजात पाठवलं. या परीक्षेत तर मी पुणे विद्यापीठात पहिला आलो. याची प्राचार्यांनी दखल घेतली आणि मला कॉलेजात 'लेक्चर' देण्यास पाचारण केलं. या वळणावर मी 'पब्लिक स्पिकिंग' शिकलो. सभाधिट झाल्याने, संवाद साधता येत असल्याने मोठया कंपन्यात मी मोठया पदावरलवकर जाऊन पोहचलो. आयुष्य सरळ आणि मस्त चाललं होतं, म्हणजे १९९८ पर्यंत काही खास वळण नाही.
एके दिवशी एक साठीतलं जोडपं 'आफ्रिकेतून' आमच्या शेजारी राहायला आलं. झरीना आणि मोईस यांनी माझा सदतीस वर्षांचा मेंदूसाफ करायला घेतला आणि 'आणखी' पैसे कमवायला उद्युक्त केलं. 'नासिकच्या बाहेर नौकरी करायची नाही' असं ठरवलेला माणूस मीअडतिसाव्या वर्षी भारताबाहेर पडलो आणि बारा वर्षे आफ्रिकेत तर सहा वर्षे मध्यपूर्व देशांमध्ये वास्तव्य केलं. हे वळण फार महत्वाचंठरलं. विविध देशांमधील विविध वांशिकता असलेल्या लोकांना 'समजून' घेता आलं. जीवन अनुभव संपन्न होऊ लागलं कारण मी'समाजाभिमुख' होतो. खरं तर मी 'धर्मनिरपेक्ष ' होत होतो. जगात खूप भटकंती केली. माझी 'पांथस्थ'गिरी अभ्यासपूर्ण आणि आशयसंपन्न होती. याच काळामधे मला आयुष्याचा अर्थ कळू लागला. प्रवासामुळे मी डोळस झालो. हे सगळं '३८-५५’ या 'संस्कारक्षम तरुण' असतांनाच साधलं गेलं. 'आपण समाजाला काही देणं लागतो' असा आयुष्याचा अर्थ मी काढू लागलो.
हे सर्व 'साधलं' गेलं असंच म्हणीन मी कारण प्रत्येक वेळी आलेल्या संधीचा मी उपयोग केला. सामाजिक कार्य केल्याने परदेशातीलनौकरी आपण गमावू शकतो तरी मी जोखीम पत्करली आणि पुढे सरसावलो. निस्वार्थी मानव सेवेला कोणीही आव्हान देऊ शकत नाहीयाची मनोमन खात्री. आयुष्यात मी खूप 'नियोजन' वैगरे केलेलं नव्हतं. पण प्रत्येक 'वळणावर' मात्र पुढची तीनचार वर्षें 'इतकंच' पाहिलं. यामुळे मी 'लवचिक' राहिलो. लांब पल्ल्याच्या नियोजनात माझा विश्वास नाही.
असो .....
'डाव रंगता मनासारखा, कुठली हुरहुर, कसले काहूर, जरा विसावू या वळणावर' अशी भावना साठत जाते, आयुष्याचा अर्थ लावतांना. आजमितीला, साठीच्या उंबरठ्यावर मी शांत आहे. याचं मुख्य कारण प्रत्येक वळणावर घेतलेला निर्णय अचूक ठरला. 'जोखीम(रिस्क)' मोठी असली तरी माझी 'जोखीम-भूक' सुद्धा मोठी होती. आयुष्याचा अर्थ लावतांना मी 'जोखीम घेतली तर बक्षीस नक्की मिळते' हे सांगूइच्छितो.
*या वेळी वाचन झाल्यावर 'तुम्हांला 'लागलेला' आयुष्याचा अर्थ' यावर टिपणी करा. मजा येईल. स्वतःला विचारा - काय अर्थ आहेमाझ्या जीवनाचा?'*
Post a Comment