दुःखातील दुसरा धडा - नासिक कि मुंबई


 *दुःखातील दुसरा धडा - नासिक की मुंबई ?!*


'बाबा, गरज पडली तर आपण आईचं आणि दिपालीचंही ऑपरेशन एकाच वेळी करू, बॉंबेला !' - साकेत, माझा मुलगा म्हणाला. आम्ही चौघंही, (मी, साकेत, उल्का, दीपाली) मुंबईला चाललो होतो. सुनेच्या ऑपरेशनचा फॉलोअप होता तर उल्काच्या काही ऍडव्हान्सड चाचण्या करायच्या होत्या. सिस्ट म्हटलं की नको त्या शंका. मी म्हणालो 'बघू. एकाच दिवशी सासू सुनेचं एकाच कारणासाठी ऑपरेशन म्हणजे जागतिक रेकॉर्ड म्हणावा लागेल'. 


सुनेलाही अशाच प्रकारचा त्रास होत होता आणि तिची बहुदा अजून दोन ऑपरेशन्स करावी लागणार होती. नासिकच्या युरॉलॉजिस्टने उल्कास सी टि स्कॅन आणि एम आर आय करायला सांगितलं. आम्हीं केलं. खर्च रु ३००००. नासिक मध्ये ऑपरेशन करण्याच्या दृष्टीने हालचाल सुरु होती. सुनेच्या ट्रीटमेंट मुळे चौकस असल्याने आणि सर्वव्यापी मित्रमंडळ असल्याने साकेतचे आता बऱ्यापैकी मुंबईत कॉन्टॅक्ट डेव्हलप झाले होते. म्हणून साकेत म्हणाला 'बाबा आपण सेकण्ड ओपिनियन घेऊ, दिपालीचं ज्यांनी ऑपरेशन केलं त्या डॉक्टरांकडून'. मी 'ओके' म्हटलं. मुबंईच्या गायनॅक ची अँपॉईंट्मेंट घेतांना डॉक्टर म्हणाले 'मला नाशिकचे रिपोर्ट चालणार नाही. तुम्हीं आधी झंकारियाच्या लॅब मध्ये जा आणि ह्या ह्या तपासण्या करा.' माझ्या पोटात गोळा - कारण कालचे ३०००० रुपये एका मिनिटात पाण्यात. आणि आता मुंबईत टेस्ट म्हणजे ६००००/७०००० रुपये. पण मी गप्प बसलो - 'आलिया भोगासी असावे सादर । देवावरी भार घालुनिया' - देव आठवला का? - आता सांगत नाही. 


मुंबईच्या त्या तपासणी गृहाचे दोन अनुभव खूप चांगले आले - कल्पनेपलीकडे. पहिला खर्चाबाबत. ज्या टेस्ट नासिक मध्ये रु ३०००० त झाल्या त्याच टेस्टचे मुंबईत रु ३६००० लागले. म्हंजे 'खूप' नाही. माझी भीती व्यर्थ ठरली. दुसरा सुखद अनुभव म्हंजे 'क्वालिटी ऑफ रिपोर्ट्स'. उल्काची त्यांनी सखोल 'चौकशी' केली, टेस्ट च्या आधी. टेस्टिंगच्या प्रोसिजर्स आणि मशीनरी - अतिशय उच्च दर्जा, ज्याला स्टेट ऑफ आर्ट म्हणतात. याच्या उप्पर - सुशिक्षित आणि अति शिक्षित परिचारिका आणि तंत्रज्ञ. म्हणून 'PICTURE THIS’ या लॅबचे 'रिझल्ट्स' हा 'शेवटचा शब्द' मानला जातो. (झंकारिया यांची प्राइसलिस्ट इंटरनेटवर आहे). 'आम्हीं तुमच्या डॉक्टरकडे तुमचे सर्व रिपोर्ट्स पाठवून देऊ, दुपारी चार वाजेपर्यंत. तुमची अपॉइंटमेंट साडे सहाची आहे ना?' - नर्स मला विचारात होती. मी 'हो' म्हटलं आणि 'समाधानाने' बाहेर पडलो. सगळ्या तपासण्या अडीच तासात पार पडल्या - शंभर टक्के प्रोफेशनॅलिझम. 


मुंबईच्या गायनॅक कडे पोहचलो. रिसेप्शनला इंस्ट्रक्शन होती - नाशिकचा पेशंट आला की लगेच आत पाठवा. त्या नुसार आम्हीं आत गेलो.  'काय होतंय तुम्हांला?' या डॉक्टरांच्या प्रश्नावर उल्काने 'कथाकथन' केलं - पाच मिनिटे. नंतर डॉक्टर म्हणाले 'तुम्हांला जी काही (विशिष्ट रोगाची) भीती वाटतेय ती अनाठायी आहे. माझं लॅब बरोबर बोलणं झालंय. जिथे जिथे मला शंका होत्या त्यांचं स्पष्टीकरण मिळालंय. सिस्ट काढून टाकलाच पाहिजे, गर्भाशयसहित. पण घाई नाही'. आम्हीं सर्वांनी अर्ध्या एक मिनिटाचा पॉझ घेतला. शांतताभंग करत मी म्हणालो 'डॉक्टर गरज असेल तर दिपालीचं आणि उल्काचं ऑपरेशन एकाच दिवशी केलं तरी चालेल. आमची तयारी आहे'. त्यावर मुंबईचे डॉक्टर म्हणाले 'एकाच कुटुंबातील दोन व्यक्तींची सर्जरी एकाच वेळी मी करत नाही. दुसरं असं की हे रिपोर्ट्स आणखी कुणाला दाखवा अन सेकंड ओपिनियन घ्या. विचार करा आणि मग निर्णय घ्या'. आम्ही 'ठीक आहे' म्हणालो, रु १५०० फी दिली अन बाहेर पडलो.  रात्री आठ वाजता 'पंधरा वीस पानांचे' रिपोर्ट घेतले. हे रिपोर्ट्स जेंव्हा ऑपरेशन चालू होते तेंव्हा कायम रेफेरन्स म्हणून वापरले गेले. बहुदा 'पोटातील अवस्था आणि रिपोर्ट्स मधील ऑब्सर्व्हेशन्स' ताडून बघत असतील डॉक्टर.


परत येतांना आमची चर्चा झाली. माझा सूर असा होता - 


~ मुंबई म्हणजे सगळंच महाग हा माझा गैरसमज होता. 

~ डॉक्टरांशी सल्लामसलत करण्याआधी ज्या टेस्ट कराव्या लागतात त्या मुंबईतच कराव्यात. याच रिपोर्ट्स च्या आधारावर 'निर्णय' होतात. 

~ लॅबवाले डॉक्टरांना कमिशन देत असतील अशी शंका मनात आणून 'शोकाकुल' होऊ नये. 

~ मुंबईचे डॉक्टर आपल्याला हवा तेव्हढा वेळ देतात. आपले प्रश्न मात्र सेन्सिबल असावे. 

~ ढोबळमानाने सर्विस क्वालिटी मुंबई मध्ये १००% असेल तर नाशिकमध्ये ३०% आहे. 

~ ढोबळमानाने एखाद्या ट्रीट्मेंसाठी नासिकमध्ये रु ७०००० खर्च येणार असेल तर मुंबईला रु १ लाख येईल. 


*ज्याला कोणाला शक्य असेल तर ( आर्थिकदृष्ट्या / मानसिकदृष्ट्या / शाररिकदृष्ट्या ) त्याने नासिकचा अभ्यास झाल्यावर, मुंबईची चौकशी करावी आणि अंदाज घ्यावा. जमलं तर 'चलो मुंबई'. कदाचित 'मुंबई रिटर्न' हा प्रवास आपण कल्पना केल्या पेक्षा 'सोपा अन सहज' असू शकतो. तुमचं नुकसान होणार नाही याची मी खात्री देतो.*


ता. क. - नासिक मधील डॉक्टर कायम उपाशी असतात. त्यामुळे ते लुटतात. मोजक्या रुग्णात त्यांना कॅपिटेशन फी वसूल करायची असते. मुंबई अथांग आहे. पोट आणि पॉट भरलेला डॉक्टर तुम्हांला 'देव' म्हणून भेटू शकतो. आम्हांला बरेच 'देव' भेटले. खूप आश्चर्य वाटलं. अजून माणुसकी 'मेडिकल फिल्ड मध्ये आहे' हे समजलं. आम्हांला भेटलेल्या 'देवांचे' आम्हीं मोबाईल नंबर देऊ शकतो, अजून माहितीही देऊ. माझ्यावर आलेली वेळ तुमच्यावर येऊ नये, पण आली तर तुम्हांलाही देव भेटो, मुंबईचा, हीच सद् इच्छा.

0/Post a Comment/Comments