चैत्र पालवी ?!


 *चैत्र-पालवी ?!*

आज गुडीपाडवा. काल बरोबर सव्वाअकरा तो आला. घरात बच्चे मंडळींची लगबग. अनाहताने पुढे जाऊन पार्सल घेतले अन त्याचा मोबाईल अपडेट केला. तो झोमॅटोचा पोरगा घामाने चिंब झाला होता. सावळा असल्याने डार्क टोमॅटोसारखा दिसत होता. थकला होता. 'पाणी देता?' त्याने विचारले. कार्यभाग संपलेला असल्याने, डिलिव्हरी मिळाल्यावर, कोणाचही त्याच्याकडे लक्ष नव्हते. तो एक डिलिव्हरी बॉय होता. मी मात्र सतर्क होतो. त्याला सांगितलं 'आत ये अन बैस'. त्याला त्रास होऊ नये म्हणून कमी थंड पाणी दिलं. अत्यंत आदरयुक्त 'वागणूक' मिळाल्याने तो सुखावला. पाण्यामुळे प्रसन्न झाला. मला कष्टकरी मुलं खूप आवडतात. मी ब्रंच (सकाळची न्याहरी घेण्याऐवजी जरा लवकर घेतलेले दुपारचे जेवण) घेत होतो. ‘फोपो’ खात होतो. त्याच्या करीता एक प्लेट भरली आणि दिली. तो किंचित 'नाही' म्हणाला पण लगेच घेतली. म्हणजे त्याला भूक लागली असावी. मी डिलिव्हरी बॉयचा डी एन ए चेक करायला घेतला. मला नवीन गोष्टी माहित करून घ्यायला आवडतात. त्या नुसार मी प्रश्नांचा भडीमार सुरु केला. त्याला तो मोठ्या उत्साहाने उत्तरं देत होता, जणुकाही आयुष्यात प्रथमच कोणीतरी त्याला त्याच्या जॉब बद्दल विचारात होतं. उत्तरं देण्याच्या शैलीनुसार तो बऱ्यापैकी घरचा सुशिक्षित वाटत होता. 

एकीकडे 'फोपो' चा आस्वाद घेत त्याने विचारलं - या पदार्थाला काय म्हणतात? मी सांगितलं 'फोडणीची पोळी - म्हणजे 'फोपो'! तो हसला अन म्हणाला - 'बाबा 'फोपो' एकदम झकास झालीये. तुम्हीं केली? (मी होकारार्थी मान हलवली) तुम्हांला एक आयडिया सांगू का?'. आमच्या दोघांच्या गप्पांकडे कोणाचंही लक्ष नव्हते. बहुदा मी करत असलेले 'रिकामे उद्योग' त्यांना आवडत नसावे. मी त्याला म्हणालो 'सांग, काय आयडिया आहे'. यावर तो म्हणाला - 'बाबा गेल्या तीन वर्षांपासून बघतो, लोकांना हॉटेलपेक्षा घरगुती बनवलेले पदार्थ आवडतात. तुम्हीं लोकांना 'फोपो' का नाही सप्लाय करत? खूप डिमांड अश्या घरच्या पदार्थांना. माझं 'हॉटेल मॅनेजमेंट' झालंय. आमचे सर सांगायचे - *मुलांनो कस्टमरच्या जिभेला वेगळं 'वळण' लावायचं असतं. लोकांना विचित्र पदार्थ खायला आवडतं.* आपलं 'फोपो' तर सर्वव्यापी पदार्थ आहे. खूप चालेल. चालेल काय, पळेल'. तो बोलतच होता अन मी ऐकत होतो. तितक्यात त्याला फोन आला. त्याने घाईघाईत 'फोपो' संपवली. आणि माझं कौतुक करून निघून गेला - पण जातांना माझ्यातला 'युनिकॉर्न' जागा करून गेला. युनिकॉर्न म्हणजे - एक काल्पनिक एकशृंगी घोडा. मी दिवसा 'स्वप्नात' होतो. विचार करत होतो - त्या नव्या आयडिया वर. मानकारांचे सेंट्रलाइज्ड किचन, ब्रॅण्डिंग ऑफ फोपो, वितरण व्यवस्था, टॉप लाइन आणि बॉटम लाइन वैगरे वैगरे. विचारांचा घोडा धावत होता. यालाच स्टार्टअप म्हणतात. 

झोपेतही 'विचारांनी' माझा पिच्छा सोडला नाही.  सुंदर स्वप्न पडत होतं. स्वप्नात मी स्वतःला टेलिव्हिजनवर 'फूड शो' मध्ये बघत होतो. खवय्यांना सांगत होतो - 'फोपो' कशी बनवायची ते. *ताज्या पोळ्यांची 'फोपो' चांगली होत नाही, पोळ्या शिळ्याच हव्या - किंचित जाड | पोळ्या हाताने कुस्करु नये. मिक्सर मध्ये बारीक करून घ्याव्या. एक सारख्या बारीक होतात | फोडणीत मेथ्या टाकाव्या | फोपो नेहमी मंद आचेवर कराव्या. गॅस मोठा असेल तर कोरड्या पोळ्या आणखी कोरड्या होतात. | फोपो मध्ये चौकोनी चिरलेला टोमॅटो टाकावा. यामुळे फोपो ओलसर होते | वैगरे वैगरे.* नंतर बहुदा युनिकॉर्न थकला असावा, मला शांत झोप लागली. 

आज सकाळी उठलो अन मनातली 'चैत्र पालवी' चेक केली. युनिकॉर्न जागा होता. अजूनही मनातल्या स्टार्टअप विषयी कोणालाही सांगितलं नव्हतं. अडीच पोळ्यांची घरी 'फोपो' करणं वेगळं आणि 'फोपो' चं स्टार्टअप करणं वेगळं. 'करू का नको' या द्विधेत पाडव्याची सकाळ पुढे चालली होती. कल्पनेतले 'घोडे' आता निगेटिव्ह विचार पुढे आणत होते. नवसर्जनाची चाहूल लागणारा ऋतू म्हणजे वसंत.  पण वसंत फुलायचा आधीच ...... 'काहीतरी केलं पाहिजे असं वाटत असतानाच - काहीतरी केलंच पाहिजे का?' असा प्रश्न समोर नाचत होता. सतत नवे करण्याचा नाद ही सर्जनाची खुण. पण त्याचाच खून होत होता, संवत्सराच्या पहिल्या दिवशी. प्रकर्षानं वाटलं मनातली भीती अन जळमटे साफ व्हायला हवीत. केव्हांही आयुष्यात 'युनिकॉर्न' वर बसून आरूढ होता आलं पाहिजे - मग चैत्रपालवीला 'फोपो' हे निम्मित असलं तरी चालेल. एक कवी जे म्हणतो ते किंचित संपादित करून लिहितो - 

*भंगू दे काठिण्य माझे | आम्ल जाऊ दे मनीचे | येऊ दे विचारात माझ्या | आचार तुझ्या आवडीचे |*

0/Post a Comment/Comments