कोकोनट कॅप्सिकम



 *कोकोनट कॅप्सिकम*

'झाली बाई एकदाची भाजी' असं मी म्हणालो आणि भाजी मंद आचेवर ठेवली. हल्ली मी 'बायकोच्या' भूमिकेत असल्याने, भाज्या करायचा प्रयत्न करतो. म्हणून उल्काचा डायलॉग मी उच्चारला आणि इति कर्तव्यातून 'निवांत' झालो. 

तिचा पुढचा डायलॉग मात्र मी नाही उच्चारला - तो म्हणजे 'भाजी कशी होते कोण जाणे'. याचं मुख्य कारण म्हणजे मी केलेली भाजी मला आवडतेच. 'न आवडून चालेल का' असं तुम्ही म्हणाला हे मला ऐकू आलं. पण मी चिंतन करूनच माझ्या पाकक्रियेविषयीची चिंता मिटवतो. मला नेमकी कोणती चव गाठायची आहे हे मला माहित असतं. मग उद्दिष्ट पूर्ती साठी काहीही. 

आपण नेहमी कच्यामच्या भाज्या हॉटेलात जास्त पैसे देऊन निमूटपणे खातो. आठवा जरा स्टफ कॅप्सिकम. पनीर वैगरे भरून कच्च्या ढोबळ्या मिरच्या किती बेचव लागतात. भाजी कशी 'एकजिनसी' झाली पाहिजे. म्हणून मी आज कोकोनट कॅप्सिकम करायचे ठरवलं. कोकोनट का? किसलेले ओले नारळ घरात होते म्हणून. मग आज स्टफ मसाला तयार केला. त्यात तीळ टाकले. किंचित गुळ घातला. अर्ध लिंबू पिळलं. वेगवेगळ्या चवींचा 'छेद' झाला पाहिजे म्हणजे मग 'दिल मांगे मोर' अशी अवस्था होते. या जिभेकरिता तर आपण निम्मं आयुष्य घालवतो. नीट बघा. आपण जेवण्याबद्दल खूप विचार करत असतो. तहहयात. आता मी माझ्या पंच्याहत्तर वर्षांच्या काकांना दवाखान्यात भेटायला गेलो होतो. चार दिवस आय सि यू मध्ये राहून नुकतेच बाहेर आले होते. सलाइन चालू होतं, औषधे चालू आहे. मला पाहिल्यावर म्हणाले 'अनिल बिर्याणी खायची इच्छा झाली रे. काय करतो?'. खरंतर मी म्हणायला हवं होतं कि 'बरे व्हा. मग आणू'. पण मी विचारलं 'मटण की चिकन. संध्याकाळी आणतो'. काका हसले. त्या हसण्यात बिर्याणी खाल्याचं समाधान होतं. भरवीन मी त्यांना 'दोन घास बिर्याणीचे', आज संध्याकाळी. 

आता ढोबळ्या मिरच्यांकडे वळू. मी आज प्रयोग केला. अर्ध्या अर्ध्या मिरच्या गरम पाण्यात तीन मिनिटासाठी उकळवून घेतल्या. पाण्यात मीठ टाकले. गजका होता कामा नये याची काळजी घेतली. मग त्यात मसाला भरला. आणि शॅलो फ्राय केल्या. जास्त वाफवल्या नाही. जेणेकरून मसाला मिरचीत राहील. आच मंद ठेवली कारण त्या टेंडर होणं महत्वाचं. 

आहाहा. काय चव आली हो तोंडाला या मिरच्यांमुळे. मसाला आणि मिरची एकजीव जरी झाली नसली तरी एकमेकांबरोबर छान नांदत होत्या. भाजी आवडली की जेवण जास्त जातं असं मी 'बायकोला' नेहमी 'जाणीवपूर्वक' सांगत असतो. याचा अर्थ असा की - भाज्या नीट कर. 

मला स्वयंपाकात 'प्रयोगशीलता' खूप आवडते. मुळात स्वयंपाक करायला आवडतो. पाकक्रिया यात सर्जनशीलतेला वाव असतो. प्रोसेस मधील anxiety चिंता मला आवडते. खाणारा जेंव्हा म्हणतो 'भाजी मस्त झाली' की जीव भांड्यात पडतो. पण मी माझ्या आंतरिक प्रयोगशीलतेला मर्यादा टाकतो जेंव्हा मी रेडी मेड मसाले वापरतो तेंव्हा. बिर्याणी करतांना मी पाकिस्तानी मसाले वापरतो आणि सांगितलेल्या कृती प्रमाणे 'कृती' करतो. अजिबात बदल करत नाही. 

*प्रत्येक पुरुषाला स्वयंपाक आलाच पाहिजे. मोठया आनंदाचा विषय आहे हा. पूर्वी नवरा स्वयंपाकात मदत करतो, हे सांगायला स्त्री काहीशी बिचकायची आणि पुरुषालाही इतरांसमोर ते सांगणं कमीपणाचं वाटायचं. पण हल्ली असं जाणवलं की आजचा पुरुष मग तो सतरा वर्षांचा असो की सत्तरीचा - बल्लवाचार्य होण्याचा प्रयत्न करत आहे. उल्का जेंव्हा मैत्रिणींना सांगते की 'हा सध्या घरात खूप काम करतो अगदी भाजी करण्यापर्यंत .....' , तेव्हां 'ह्यांना' खूप बरं वाटतं. मग मी स्वतःला 'अन्नपूर्णा प्रवीण देवी' समजायला लागतो.*

0/Post a Comment/Comments