दिंडी - सुरेखा मुळे सुरेख !
सुरेखा, तीन मुलींची माउली, काल संध्याकाळी माझ्या जवळ आली अन म्हणाली 'काका उद्या तुमचं प्रस्थान जेजुरीला सकाळी सहावाजता होणार आहे. मी तुम्हांला पाच वाजता उठवते. गरम पाणी तयार ठेवते. लगेच अंघोळ करून घ्या, बरका'. मी, मालकीण बाईनां'हो' म्हणालो. आमची ओळख दीड दिवसाची. आमचा सासवडचा मुक्काम 'जाधव' यांच्या शेतात पडलेला आहे. शेत अंजिरांचं आहे. सौ सुरेखा जाधव या मालकीण बाई. सर्व 'माऊलींचं' यथा योग्य आगत स्वागत हसत मुखाने करत होत्या. त्यांच्या तीनही मुलींवर'वारकरी संप्रदायाचा सेवाभाव' कृतीत दिसत होता. माझ्यावर त्यांचे जास्त लक्ष होते असे जाणवले कारण 'वासरात लंगडी गायआकर्षक'. बहुदा माझ्या 'शहरी चेहऱ्यामुळे' माउली सुरेखा मला जास्त मदत करत असाव्यात. संपूर्ण कुटुंबाशी स्नेह जडला होता. मलाअंजीर, सीताफळ वावरात मुक्त संचार करायला मुभा दिली. काल मी आणि राम ने मनसोक्त अंजीर खाल्ले - झाडावरून डायरेक्टतोंडात.
आज सकाळी माउलीने पाणी काढून ठेवले आणि मी दिंडीत गरम पाण्याने अंघोळ केली - पाच तिसला. मग मस्त चहा झाला - कोरा. वळकुटी आणि बॅग भरली आणि ट्रक मध्ये फेकली. बरोबरची झोळी - मायने दिलेली - हलकी केली आणि झेंड्यांसमोर येऊन उभाराहिलो. तेव्हढ्यात सुरेखाने हाक मारली. म्हणे 'काका हे अंजीर ठेवा बरोबर. वाटेत खावा'. मी क्षणभर दिग्मूढ झालो. दीड दिवसाच्यासंपर्कात केव्हढी ती आपुलकी. केव्हढी ती काळजी. मी भारावून गेलो. 'कशाला?' , 'नको' असं काहीही न म्हणता 'दान' घेतले. तिचेडोळे 'समाधानी' दिसले. मी निशब्द. ऍडमिननी आरोळी मारली. प्रस्थान अटळ होते. सुरेखाचं प्रेम झोळीत पडल्याने झोळी जड झालीहोती पण जडपणा वाटत नव्हता. मन उल्हसित झालं आणि पहिलं पाऊल टाकतांना म्हणालो 'येतो मी'
आजच्या दिवसाचं संक्रमण सुरु असतांना विचारचक्र सुरु होते. कोण सुरेखा? कोण मानकर? परत भेटण्याची सुतराम शक्यता नाही. पण जेंव्हा आम्हीं भेटलो, तेंव्हा एकमेकांचा आदरच केला - एक वारकरी दुसऱ्या वारकर्यांचा करतो तसा. सुरेखात मला रुक्मिणीदिसली. माउली विजय जाधव सुस्वभावी आहे. चिंतनात मग्न असतात.
माउली सुरेखा, तुझे खूप कौतुक. तुला अनेक उत्तम आशीर्वाद. तूझ्यासारख्यामुळे खडतर दिंडी सुसह्य होते. सुरेख होते.
*खरे सांग विठ्ठला तूच हे सगळे घडवून आणतोस ना रे? रुक्ष होत चाललेल्या मनाला असा एखादा दिवस दाखवतोस कि आनंदसागरहिखुजा वाटावा ....*
Post a Comment