भेटीचा आनंद


 *'भेटीचा आनंद'*

भेटीचा आनंद हा व्यक्ती सापेक्ष, वस्तू सापेक्ष, स्थळ सापेक्ष असतो असं मला वाटतं. त्यातही भेट देणारा अन घेणारा याच्या मानसिकतेवर अवलंबून असल्याने कमी जास्त होत असतो. भेट हे एक अद्भुत रसायन आहे आणि त्याचा मनातल्या मनात ( व्हर्चुअल ) स्फोट होऊ शकतो. याच कारणाकरिता मला हि 'देव-घेव' आवडत नाही. माणूस हा कायम 'अपेक्षा' यात अडकलेला असतो. आपल्याला भेट मिळाली तर समजा शंभर युनिट आनंद मिळतो. पण भेट मिळाली नाही तर हजार युनिट दुःख होतं. म्हणून मी काय म्हणतो, पटलं तर बघा, *'तू मला काही देऊ नको आणि मी काही देणार अशी अपेक्षा ठेऊ नको'.* कोणीही भेटला / भेटली कि चार शब्द 'मनमोकळं' बोलू - आपण जिवंत आहे याच्या जाणिवा निर्माण करू आणि 'भारावलेल्या मनानं' निरोप घेऊ. *मला भेटवस्तू पेक्षा 'तुझी भेट' हवी आहे. बराचश्या 'भेटवस्तू' काही सेकंदात 'शिळ्या' होतात तर 'मनांची भेट' कायम ताजी असते.* हे सर्व प्रौढांसाठी लिहितो बरं. विचार करत बसा. 

आज उल्काचा वाढदिवस. पारंपरिक पद्धतीने 'ओवाळणं' झालं. दिपालीने 'पारंपरिक - ड्रेस' गिफ्ट दिला. दीर्घ आणि आरोग्य मिळो याविषयी सर्वांनी 'चिंतन' केलं. काहींनी यांत्रिक पद्धतीने तर काहींनी फोन करून. दोनीही पद्धती चांगल्या असल्या तरी यांत्रिक शुभेच्छा न कळत न बघता 'वाहून' जातात तर 'मानवी' शुभेच्छा 'झिरपतात' - नक्कीच जास्त आनंद देतात. क्षणभर का होईना - दोघांच्याही आठवणींचा जो डोह असतो - त्यावर 'तरंग' उमटतात. असो. 

आज नातवंडांनी उल्काला 'इअर बड्स' दिले. ते वायरलेस बटणं कानात घातले कि 'लई भारी' ऐकायला येतं. त्वमेवाचा जेंव्हा वाढदिवस होता तेव्हां त्याने 'गिफ्ट रूपाने' आजीकडून ते 'वसूल' केले होते. ते आजीलाही आवडले होते. गेल्या दोन महिन्यांपासून आजी थोडी दुःखी होती. तिलाही वायर असलेल्या बड्स मधून 'अचानक' कमी ऐकायला येत होतं. म्हणून मनासारखी आणि हवी असलेली गिफ्ट मिळाली म्हणून 'बाईसाहेब' आपला आनंद लपवू शकल्या नाही. लगेच वापरात येईल अशी वस्तू असेल तर ... आपण सहज घेणार नाही अशी वस्तू असेल तर ... 'भेटीचा' आनंद 'द्विगुणित' होतो. 

*ब्लॉग संपला. पण तुम्हीं वाचक मंडळी 'घरची' आहात म्हणून खरं काय ते सांगतो.*

नातवाचे नवे बड्स तिने वापरून पहिले तेंव्हा ते तिला आवडले होते. गेल्या दोन तीन महिन्यात तिने मला खूप वेळा सुचवले - तिलाही ते हवे होते. आहे ती वस्तू खराब अथवा निरुपयोगी झाल्यावरच दुसरी वस्तू घ्यायची असा माझा नेहमी 'अट्टाहास' असतो. म्हणून मी काही भाष्य - घेऊ, बघू, आहे ती वापर - करत नसे. पण 'हट्ट' तो हट्टच असतो. मग मी मुलाला सांगितलं - गुपचूप - कि आईला ते बड्स गिफ्ट दे. खर्च करायची संधी मिळाली - नवीन गॅजेट्स वर - म्हणून तोही आनंदाला. त्याने तत्पर कार्यवाही केली. हलवायाच्या घरावर तुळशी पत्र मी ठेवलं का? दुसऱ्याला सांगायचं, तिसऱ्याला 'ही' गिफ्ट दे म्हणून ...

*थोडक्यात 'गंमत' उरकली. कारण आमचा नातू, त्वमेव, आजीला हल्ली सारखं म्हणत असतो - आजी तू नवा मोबाईल घे गं - हे मी दोनदा तीनदा ऐकलं. नवीन संकटाची 'चाहूल' मला लागली. 'जुना खराब झाल्याशिवाय .....' हा अट्टाहास 'बड्स' च्या बाबतीत फेल गेला. पण 'मोबाईल नवा लवकर नाही. गळ्यात माळ घालायची का?' असं मी मनात म्हणालो. तुम्हीं गालात हसत आहात हे दिसतंय मला.*

मंडळी, स्वतःकडे नीट बघितले तरी 'मज्जा' येते. डोळसपणे बघता आलं पाहिजे. आपला बराच वेळ 'दुसर्यांकडे' बघण्यात जातो. 

0/Post a Comment/Comments