आवरा-आवर
आवरा-आवर त्रासदायकच असते. सगळं आवरायचं आणि परत त्या सगळ्या जुन्याच गोष्टी नवीन जागी... नव्यानं मांडायच्या... पणआज मी काही 'शोधण्याच्या' निम्मिताने उचक पाचक करत होतो. बऱ्याच वेळा हवी असलेली वस्तू सापडत नाही. पण ... जुनी एखादीवस्तू, 'आत्ता न लागणारी', सापडते अन मन थबकते. क्षणार्धात गत काळात प्रवास सुरु होतो. तसंच आजही झालं. मी थेट ...
*२३-८-२००४ सोमवार*
आशाने मला लिहिलेलं पत्र सापडलं. पत्र ओलं होतं. आपुलकीनं. चिंतेनं. मायेनं. प्रेमानं. काळजीनं. बहिणीनं, तिचं मनोगत व्यक्त केलंहोतं. भाऊ खूप दूर होता ना! समुद्रापलीकडे. आफ्रिकेत - म्हणजे जंगलात (असा गैसमज). म्हणून पत्र लिहिलं होतं. राख्या पाठवल्याहोत्या अन एक चिट्ठी वहीच्या पानावर, पाठपोठ लिहिलेली. तसं बघितलं तर मला आफ्रिकेत येऊन चार वर्षे झाली होती ... तरीहीतिच्या भावना ताज्या होत्या. मी चारशे लोकांच्या आफ्रिकन वस्तीत, एका लहान खेड्यात राहत होतो. पण आज डोळ्यात चटकन पाणीआलं - कारण? कोणीतरी आपला विचार करत आहे हे जाणवल्यामुळे. राखी पौर्णिमा होऊन आठवडा उलटला होता. राखी पाठवायलाका उशीर झाला याचा उहापोह पत्रात होता. आशाने राख्या एअर मेल ने पाठवल्या याचं मला आश्चर्य वाटलं. माणूस दूर गेलं कि प्रेमासजास्त भरती येते का? असा विचित्र विचार मनात येऊन गेला. पण तो बाजूला सारून - मी तिला तत्काळ फोन करायचा प्रयत्न केला. फोन लागला नाही. मला झालेला आनंद मी मनातच साठवला. जपला. आणि आज शब्दरूप केला. त्या दिवशी एकट्यानेचराखीपौर्णिमा साजरी केली. कशी? मोठ्या स्टाइलीत मनगटावर राखी बांधली आणि कृष्णवर्णीयांना सांगितलं - राखी म्हणजे काय? तिचं प्रयोजन, वैगरे. काहींनी 'इंडियन कल्चर' म्हणून टिपणी केली. मला झालेला आनंद वाटून टाकला. भाऊबीज (दिवाळी जवळ आलीहोती) काय द्यावी या विचारात शांतपणे झोपलो. अशी होती २००४ मधली व्हर्चुअल राखीपौर्णिमा.
आज परत चिट्ठीची घडी घातली. पाकिटात राख्या 'जपून' ठेवल्या. किंबहुना 'आठवणी' परत जागेवर ठेवल्या. परत जेंव्हा 'आवराआवर' करीन तेंव्हा परत 'रंजन' होईल. नातं हे वैयक्तिक असतं. आपण जगात कधी आलो यावर ते अवलंबून असतं. आपण गेलो की 'नातं' संपतं. आवरा-आवर ही हयातभर सुरूच असते. संपायचं नावच घेत नाही... त्यात मला जुन्याच गोष्टी नव्या जागी...नव्यानं मांडायचा छंदआहे.
*१४-८-२०२२, सोमवार.*
आज आशा माहेरी आली आहे. राखी बांधायला. राखीपौर्णिमा मस्त साजरी झाली. पण .... त्या 'राखीपोर्णिमेसारखी' मजा नव्हती. आज सगळं 'गृहीत'धरल्यासारखं होतं. किंचित 'यांत्रिक'. नेमेचि येतो पावसाळा - म्हणून त्यात विविधता नव्हती. कि असं असेल? माणूस उतारवयात घसरू लागला कि 'परंपरेतील आनंदालाही' ओहोटी लागते. अठरा वर्षे झाली. आम्हीं दोघंही मोठे झालो होतो. माझंपूर्वीसारखं सणात मन कमी लागतं. तोच तोच पणा आलाय.
असो. एक बरं आहे. आमचं त्रिकुट, मी, भाऊ आणि बहीण - आत्तापर्यंत तरी सुखात आणि आनंदात आहोत. पुढील काळाच्या उदरातकाय वाढून ठेवलं आहे ... माहित नाही.
अशी आहे कालची आणि आजची राखी पौर्णिमा!
Post a Comment