*हुसळ, मिसळ !*
मी सुनीलला म्हणालो कि ' ग्रेप एम्बसी मध्ये जाऊ' तर तो म्हणाला 'नको - गंगेवर जाऊ. गंगा टी हाऊस मध्ये'. मी हो म्हणालो लगेच. कारण? वाद नको होता म्हणून. आणि सुनील मिसळ तज्ज्ञ आहे म्हणून.
*संशोधनाअंती आणि प्रदीर्घ चिंतनानंतर माझ्या एक लक्षात आलंय की मिसळ कोठेही खा, चव जवळजवळ सारखीच असते. त्यामुळेहल्ली कोणी मिसळ खायची म्हटलं की जो बिल भरणारा आहे त्याचं मी ऐकतो. मिसळ या बाबत माझी काही मतं आहे त्याची नोंद घ्या- निंदा न करता.
एक - मिसळ कोणाबरोबर खात आहोत या वरून मिसळीची चव ठरते. गप्पा भयंकर रंगल्या पाहिजे - इतक्या की - मिसळीला चवअसते हेच आपण विसरतो.
दोन - मिसळ खाणं हा प्रदीर्घ प्रवास असला पाहिजे. घाई घाईत मिसळ खाताच येत नाही. गप्पा आणि खाणं कमीतकमी दीड तासचाललं पाहिजे - घडाळ्याच्या काट्याकडे न बघता. उसळ संपली की रस्सा मागवावा. एक्सट्रा कांदा, तर्री मागवत 'बसून' राहावे. मगत्या भांड्यात तळाशी काही उसळ आहे का हे बघावे. एका वेळी दोन मिसळ मागवू नये. पहिल्या मिसळीचा तो अपमान आहे.
तीन - आजूबाजूचे वातावरण आणि बरोबरचे लोक हे 'रसास्वादाकरिता पोषक' असतात. कुठे द्राक्षाच्या मांडवाखाली तर कुठे शेताततर कधीकधी गाडीवर - लांब. थंडीत 'खारीक खोबरे लाडू पेक्षा मिसळ पौष्टिक असते'.
चार - 'तुझ्याआयची मिसळ', 'माझ्याआयची मिसळ', काका काकू मामा मामी या सगळ्या मिसळी सारख्याचं 'बंडल' असतात. त्यामुळे 'कन्फयुज' होऊ नये. आपल्याला कशी मिसळ हवी आहे ते समजले पाहिजे. लींबू, दही, पोहे, तर्री याचं काय प्रमाण आपल्यालाआवडतं हे बघा. थोडक्यात 'चवीत समतोलपणा' आणता आला पाहिजे. उगीचच मिसळवाल्याला दोष देऊ नये.*
असं बरंच काही सांगता येईल. नंतर कधीतरी. आज सकाळी मी सायकल बाहेर काढली. मेन रोड वरून जी एम पुतळ्यावरून ( गाडगेमहाराज पुतळ्यावरून) तिवंध्या कडे जाऊ लागलो. पणत्यांची दुकानं पाहून दिवाळी जवळ आली याची नोंद घेतली. पुढे भद्रकाली येथेपोहचल्यावर बघितलं तर एकजण 'हुसळ' विकत होता. कुतूहल जागं झालं. जवळ जाऊन बघतो तर तो 'उसळ - भिजवलेली मटकी' विकत होता. हुसळ हा शब्दाने मन घायाळ झालं - पण मिसळीची ओढ असल्याने पुढे सायकल दामटत राहिलो. ग्राम देवता 'भद्रकालीदेवीचा' बोर्ड नीट वाचला आणि रस्त्यावरच्या देवीला हात जोडला. बुधा जिलबीवाला - दुकान नऊला सुद्धा बंद ?! मग गंगेकडे जाणाऱ्यागल्लीत घुसलो. माझ्या आवडत्या 'वाड्या समोर' उभा राहिलो. खिडकीवर पडदा होता. जोरात ओरडलो - 'पेशवे या खाली.' तर आतूनआवाज आला - 'ते गेले मिसळ खायला.'
मग एका मिनिटात 'गंगा टी हाऊस' येथे. उतार असल्याने पायडल मारायची गरज नाही. आमची गॅंग बसली होती. गंगा टी हाऊस हाअर्वाचीन आणि प्राचीन 'मिसळ जॉईंट' असावा. नदीसमोरील अत्यंत जुने घर. रामायण काळात या नदीकाठी राम सीता नक्की आलेअसतील. म्हणजे तेंव्हा त्यांना ब्रेकफास्ट लागत असेलच ना? असो. नाशिकचे काही जुने फोटो असं सांगतात की गंगा टी हाऊस च्यासमोर साधारण आठशे वर्षांपूर्वी मासेमारी व्हायची. मग कोळी लोक सुद्धा मिसळ खायला येत असणारच. मी इकडे तिकडे बघितलं - पेशवे काही दिसले नाही. म्हटलं गेले असतील 'मोदकेश्वर गणपतीला'. मी टी हाऊस समोरील न्'यू मोदकेश्वर गणपतीला' नमस्कारकेला. आणि पारावर गेलो. म्हटलं 'विहंगम दृश्य' पाहू. पण नाशिक मुनसिपाल्टीने काँक्रीटच्या कमानी टाकून 'दृश्याचा' सत्यानाशकेलेला पाहिला. गंगा घाट 'मृत झालेला' पाहिला. थोडं पुढे स्मशान आहे. जुना, सुंदर 'गोदावरी घाट' तेथे दररोज मरत आहे. मनविषण्ण होत होतं पण स्वतःला सावरलं - कारण मिसळ खायची होती.
मी, ऐट्या, सुन्या, गोंड्या, सावळे आणि वसंत यांनी 'तेलकट' मिसळीच्या दुकानात प्रवेश केला. वीस लिटर मिसळ ( साधारण दोनशेप्लेटी ) खदाखदा उकळत होती. खमंग वासाचं डीप ब्रीदिंग केलं. पिवळे धम्मक पोहे बघितले. बटाटे वडे नुकतेच पोहून बाहेर आले होते. आचाऱ्याने ते व्यवस्थित लावून ठेवले होते. मी त्याच्या मोठ्या प्लेटमधील एक बुंदी तोंडात टाकली. मिसळ अविष्कारासाठी मन आणिशरीर तयार झालं होतं. सुनीलने ऑर्डर दिली - सहा मिसळ सहा वडे. वेटरने 'गलासात बोटं न बुचकळता' सहा रिकामे ग्लास आणिबिसलेरी आणली. आमच्या गप्पा सुरु झाल्या. .... आणि ब्रह्मनंद .... अनुभवू लागलो. दीड तास कसा गेला हे कळलं नाही. मिसळ बरीहोती पण वडा भन्नाट. मी सोडून इतरांनी दोन पाव हाणले - अगदी भिजवून भिजवून. बिल दिल्यावर, दुकानाच्या पायऱ्या उतरल्यावर, 'उरलेल्या' गप्पा मारल्या. पोट भरलं तरी मन भरलं नव्हतं. 'गंगेवरचा बाजार' बसू लागला होता.
मन प्रसन्न झालं होतं. तेवढ्यात राम-सीता आले असं वाटलं. पण गळ्यात 'मंगल-सूत्र' नाही दिसलं - म्हणजे ते लैला-मजनू असावेत. च्यायला सकाळी सकाळी ...... अनेक विचार येऊ लागले मनात.
*'बशीतल्या पावाला ( म्हंजे मजनूला )
मिसळ म्हणाली लाजून (म्हंजे लैला )
असा दूर का उभा तू
मी तुझ्यासाठी बसले सजून*
तो जवळ सरकला ... तशी मी टांग मारली अन मित्रांचा निरोप घेतला .... परत भेटण्यासाठी.
तळ टीप - फोटो अनुक्रमाने बघावे.
Post a Comment